बाळ: ७ महिन्यांचे
तुमच्या बाळाची उत्सुकता वाढते
तुमच्या बाळाला आता कदाचित स्वतःहून खायची इच्छा होईल. कदाचित तुम्ही ज्या चमच्याने त्याला भरवत आहात तो पकडेल, किंवा तुमच्या ताटलीतून पदार्थ घेईल. त्याच्या ताटलीत थोडेसे मऊ पदार्थ ठेवून बघा. त्याला ते उचलून खायला आवडेल! लक्षात ठेवा मुलींना मुलांएवढेच अन्न लागते.तुमच्या बाळाची भूक चांगली असली, तरी त्याला फारसे दात नाहीत. त्यामुळे ते हिरड्यांनी चावू शकेल किंवा तोंडात चघळू शकेल अशा पदार्थांनी सुरुवात करा.
या वयात बाळांची उत्सुकता वाढते. ते कदाचित खेळणी फेकून देईल किंवा त्याच्या बहिणीचे केस ओढेल! मात्र म्हणून तुमचे बाळ वाईट वागते असे नाही तर ते केवळ कशामुळे काय होते हे पाहात असते. त्याला गोष्टी फार वेळ आठवणार नाहीत, त्यामुळे त्याला त्यासाठी समज देऊनही फारसा फरक पडणार नाही. पण त्याचे लक्ष सहजपणे इतरत्र वळवता येईल. त्यामुळे त्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबविण्यासाठी त्याला एखादे खेळणे दाखवा किंवा गाणे गा.
त्याच्या दातात फटी असल्या तरी काळजी करु नका. तुमच्या बाळाच्या दातांमधील या फटी ते तीन वर्षांचे होईपर्यंत, एकदा त्याचे दुधाचे सगळे दात आले की बुजून जातील.
आता, तुम्ही लांब गेलात तर तुमचे बाळ अस्वस्थ होईल. त्याचे तुमच्याशी इतके घट्ट नाते निर्माण झाले आहे की तुम्ही अगदी मिनिटभरासाठीही त्याच्यापासून दूर गेलात तर त्याला रडू येऊ शकते. हे सामान्य आहे, व थोडा वेळ लांब राहिल्याने तुमचे बाळ इतरांमध्ये मिसळू शकेल. लवकरच त्याच्या लक्षात येईल की तुम्ही नेहमी त्याच्याकडे परत येता.
तुमच्या बाळाच्या भावना आता अधिक स्वाभाविकपणे दिसून येतील. ते कदाचित त्याला माहिती असलेल्या लोकांना पापा देईल. ते लोकांच्या मनस्थितीचे निरीक्षण करायला व त्याची नक्कल करायलाही सुरुवात करते. त्याने एखाद्याला रडताना पाहिले तर ते देखील कदाचित रडायला लागेल.
माझ्या बाळाला किती अन्न दिले पाहिजे?
मुलांना व मुलींना सारख्याच प्रमाणात अन्न आवश्यक असते.तुमच्या बाळाला त्याच्याजन्मानंतर पहिल्या ६ महिन्यात फक्त तुमच्या स्तनांचे दूध हवे असते. यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला द्यायच्या अन्नाचे प्रमाण वाढवू शकता. ते २ वर्षांचे होईपर्यंत त्याला तुमच्या स्तनांच्या दुधाची गरज आहे.
त्याचे अन्न पुढीलप्रमाणे हळूहळू वाढवावे:
वय ६ महिने: स्तनांचे दूध हेच तुमच्या बाळाचे मुख्य अन्न आहे, मात्र आता त्याला इतर पदार्थही सुरु करता येतील. तुमच्या बाळाला कुस्करलेले घरगुती अन्न दिवसातून दोन वेळा द्या. तुमच्या बाळासाठी प्रत्येक जेवणात २ घासही पुरेसे आहेत. स्तनपान सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या खिचडी,डाळीचे पाणी व पेज यासारख्या साध्या पदार्थांनी सुरुवात करा. तुम्ही व तुमचे कुटुंब जे पदार्थ खाता ते देखील तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता मात्र ते पदार्थ व्यवस्थित कुस्करलेले असतील याची काळजी घ्या. तुमच्या बाळासाठीच्या पदार्थांमध्ये मीठ किंवा मसाले घालू नका.
वय ८ महिने: तुमच्या बाळाला दिवसातून ३ वेळा खायला लागेल. प्रत्येक जेवणाच्या वेळी अन्नाचे प्रमाण हळू हळू ३ घासांपर्यंत वाढवा.
वय ९ महिने: या वयापर्यंत त्याचे एक वेळचे जेवण अर्धी वाटी अन्नाएवढे वाढले पाहिजे. तिच्या इतर २ जेवणांच्या वेळी साधारण ३ घास अन्न द्या. आता ते त्याचे अन्न उचलू शकेल. त्यामुळे त्याला पोळी, ब्रेड, भरलेला पराठा किंवा उकडलेल्या भाज्या यासारख्या पदार्थांचे लहान घास द्या.
वय १० महिने: तुमच्या बाळाला आता दिवसाला २ अर्ध्या वाट्या अन्न भरवा. त्याच्या उरलेल्या इतर जेवणांच्या वेळी, त्याला केवळ काही चमचेच अन्न आवश्यक असते.
१ वर्ष: त्याला दिवसाला ३ किंवा ४ अर्ध्या वाट्या अन्न, अल्पोपहारासह लागेल. पुढील वर्षभरात वाटी हळूहळू पूर्णपणे भरा.
तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवा
तुम्ही पुढील ४ प्रकारे तुमच्या बाळाला तुमच्या घरात सुरक्षित ठेवू शकता:- तुमच्या घरात तुमचे बाळ उचलू शकेल अशा काही वस्तू आहेत का हे दररोज तपासा. त्याच्या घशात अडकू शकतील अशा नाण्यासारख्या लहान वस्तू त्याच्या हाताशी ठेवू नका. सुऱ्या, कात्री व पेने यासारख्या टोकदार वस्तू व खाण्यासाठी व पिण्यासाठी असुरक्षित असलेल्या कोणत्याही वस्तू लांब ठेवा. पेयाच्या किंवा पाण्याच्या बाटल्यांमध्ये घासलेट ठेवू नका. तुमचे बाळ ते चुकून पिऊ शकते.
- तुमच्या बाळाच्या अंगावर काही पडणार नाही याची खात्री करा. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री करा. कोणत्याही विजेच्या तारा किंवा दोर किंवा दोरखंड व्यवस्थित गुंडाळून व त्याच्या हाती लागणार नाही असे ठेवले पाहिजेत! तुम्ही एखादा दिवा किंवा बैठक किंवा टेबल फॅन वापरत असाल तर तो सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करा.
- तुमच्या बाळाला आग व पाण्यापासून सुरक्षित ठेवा. तुमच्या बाळाला कुतूहल असते; ते कदाचित आगीच्या ज्वालांना हात लावेल व हात भाजून घेईल. तुम्ही स्वयंपाक करत असताना ते कोणत्याही गरम वस्तूला हात लावणार नाही याची खात्री करा. मध्ये एखादा अडसर ठेवायचा प्रयत्न करा. त्याला पाण्याच्या मोठ्या भांड्यांपासून दूर ठेवा. या भांड्यांवर घट्ट-बसणारे झाकण ठेवा, म्हणजे ते त्यात पडणार नाही.
- लक्षात ठेवा, तुमचे बाळ जेव्हा चालू लागते व उभे राहते, तेव्हा त्याला कदाचित चढावेसे वाटू शकते! धोकादायक वस्तू व तारा त्याच्या हाताशी लागणार नाहीत याची याची काळजी घ्या, ते खुर्च्या व टेबलांवरुन पडणार नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवा.
माझे बाळ कधी उभे राहील?
बहुतेक बाळे सुरुवातीला ८ ते १० महिन्यांदरम्यान उभे राहण्याचा प्रयत्न करतात. तुमचे बाळ कदाचित तुमच्या हाताच्या, किंवा भिंतीच्या किंवा फर्निचरच्या एखाद्या भागाचा आधार घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न करेल.सुरुवातीला, तुमच्या बाळाला तुमचा किंवा फर्निचरच्या एखाद्या भागाचा आधार घ्यावा लागतो. ११व्या महिन्यापर्यंत, ते तुमचा आधार न घेताही उभे राहू शकेल. त्याने असे केल्यानंतर त्याचे भरपूर कौतुक करा व मिठीत घ्या.
तुमच्या बाळात आत्मविश्वास आल्यानंतर, ते फर्निचरलाच धरुन इकडे तिकडे फिरु लागेल. ते जेव्हा हे करु लागेल, त्यानंतर लवकरच ते चालू लागेल!
तुमच्या बाळाला कदाचित सहजपणे उभे राहता येईल, मात्र त्याला पुन्हा खाली बसणे कदाचित अवघड वाटेल! तुम्ही तुमच्या बाळाला उभे राहण्यापासून ते बसणे शिकण्यासाठी मदत करु शकता. त्याला उचलून पुन्हा बसविण्याऐवजी त्याला गुडघे कसे दुमडायचे हे सांगा. त्यानंतर त्याला प्रयत्न करायला सांगा! त्याला गुडघे कसे दुमडायचे व खाली कसे बसायचे हे शिकण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात.
तुमचे बाळ इकडे तिकडे फिरत असताना त्याच्यासोबत राहा, म्हणजे ते खाली पडल्यास, त्याला लागणार नाही याची तुम्ही खात्री करु शकता. म्हणजेच ते जेव्हा स्वतःहून पहिले पाऊल टाकेल, तेव्हा तुम्ही ते चुकवणार नाही!
सर्व बाळांचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने होतो, काही बाळांचा इतरांपेक्षा वेगाने होतो. तुमच्या बाळाचा विकास कसा होतोय याविषयी तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आरोग्य सेविकेशी बोला.
Post a Comment