स्वतःची काळजी कशी घ्यावी?

आजच्या धावपळीच्या जीवनात सौंदर्य टिकवण्यासाठी दर वेळी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरीच सौंदर्य जपता आले तर?... वेळ आणि पैशांची बचत करून सौंदर्य खुलवणाऱ्या अशा सहजसोप्या उपायांविषयी. 


माणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे, किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते. "आपण सुंदर दिसावे' या जाणिवेमुळेच सौंदर्य टिकवण्यासाठी, अधिक खुलविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातात. सौंदर्य टिकविण्यासाठी पूर्वी नैसर्गिक गोष्टींवर अधिक भर दिला जायचा. मात्र हळूहळू माणसाची प्रगती होऊ लागली, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले तसा सौंदर्यशास्त्राचाही विकास होत गेला आणि त्यातूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्य जपण्याचा मार्ग दाखवणाऱ्या, सौंदर्यवृद्धीसाठी मदत करू शकतील अशा "ब्युटी पार्लर्स'ची निर्मिती झाली. 


आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. अशा वेळी काही साध्या- सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही कोणताही खर्च न करता! सौंदर्य टिकविण्यासाठी, खुलविण्यासाठी घरच्या घरीच करता येणारे सहजसोपे उपाय. 


त्वचेची देखभाल खरे तर आपला चेहरा नितळ, सतेज, निरोगी असावा यासाठी सगळेच अगदी मनापासून प्रयत्न करत असतात. पण रोजच्या धावपळीत चेहऱ्याच्या स्वच्छतेकडे, निगराणीकडे पुरेसे लक्ष देता येतेच असे नाही. शिवाय वातावरणातील बदल, प्रदूषण, धूळ, ऊन अशा कितीतरी गोष्टींचे दुष्परिणाम त्वचेवर होत असतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, त्वचा नैसर्गिकरीत्या तजेलदार राहावी यासाठी अर्थातच थोडा वेळ देण्याची गरज आहे. घरच्या घरी सोपे उपाय करण्याआधी आपली त्वचा नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते जाणून घ्यायला हवे. सर्वसाधारणपणे त्वचेचे तेलकट, कोरडी आणि सर्वसाधारण असे तीन प्रकार केले जातात. या प्रकारानुसार त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलता येऊ शकते.  सर्वसाधारण त्वचेसाठी  

* नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे. 


* दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन पुळ्या- पिंपल्स येत नाहीत.  

* त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी तर होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते. 

* रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. दिवसभराची धूळ त्यामुळे निघून जायला मदत होते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो. 

* अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतला, तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळायला मदत होते. 

* त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी 3-4 थेंब लिंबूरस, चिमूटभर शुद्ध हळद, 1 चमचा काकडीचा रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.  

* काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावता येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होतो. तसेच त्वचा मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात.  

* त्वचा अतिशय नाजूक असते, हे लक्षात घेऊन मेकअप करतानाही काळजी घेणे गरजेचे असते. तसेच मेकअप व्यवस्थित उतरवलाही जायला हवा. त्यासाठी क्‍लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करता येईल. मेकअपमुळे होणारी त्वचेची हानी टाळता येऊ शकेल.  

* मेकअप उतरवण्यासाठी 1 टेबल स्पून तांदळाची पिठी आणि 2 टेबल स्पून दही एकत्र कालवून तयार झालेले मिश्रणही क्‍लिंजिंगप्रमाणे वापरता येईल. 

* त्वचेला घट्टपणा यावा, त्वचेवरील सुरकुत्या कमी व्हाव्यात याकरता ग्लिसरिन, अंड्याचा पांढरा भाग, 3-4 थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्याला दोनदा थर द्यावेत आणि मिश्रण वाळल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.  

* जायफळ दुधात उगाळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी व्हायला मदत मिळते. 

तेलकट त्वचेसाठी  

"आपली त्वचा तेलकट का?' या प्रश्‍नाने अनेकांना वैताग आणलेला असतो. कारण तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपचार करताना नाकीनऊ येतात. मात्र, समतोल आहार आणि भरपूर पाणी पिण्याबरोबरच जर काही साध्या-सोप्या गोष्टींचा अवलंब केला, तर तेलकट त्वचाही त्रासदायक वाटणार नाही. 

* रात्री कच्च्या बटाट्याचा कीस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला, तर त्वचेतील अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. 

* गव्हाचा कोंडा, मुलतानी माती, चंदन, गुलाबपाणी यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा निरोगी आणि थंड व्हायला मदत होते. 

* चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करून त्वचा उजळ, मऊ व्हावी यासाठी रात्री मसूर पाण्यात भिजत घालावेत; सकाळी ते वाटून दुधामध्ये घालून मिश्रण तयार करावे आणि ते चेहऱ्याला लावावे. 

* पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनी 15 दिवसांतून एकदा चेहऱ्याला वाफ द्यावी. पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदन पावडर, ग्लिसरिन, गुलाबपाणी यांचा "फेसपॅक' करून लावल्यानेही त्वचा मऊ होते आणि तेलकटपणाही कमी होतो. 

कोरड्या त्वचेसाठी 

तेलकट त्वचेच्या मानाने कोरड्या त्वचेला कमी काळजी घ्यावी लागते. पण जर त्वचा खूपच कोरडी झाली, तर ती निस्तेज वाटते. त्यामुळे कोरडेपणा जास्त असणाऱ्या त्वचेची उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. 
* कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवा. 

* त्वचा मऊ- मुलायम व्हावी यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहायला मदत मिळू शकते. 

* रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा. 

 * थंडीत कोल्डक्रीम, मॉइश्‍चरायझरचा आवर्जून वापर करायला हवा. त्यामुळे त्वचा फुटणार नाही आणि त्वचेचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. 

* नारळाच्या पाण्यात ताजी साय घालून तयार केलेले मिश्रण लावण्यानेही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व सुरकुत्याही कमी होतात.  

* चेहरा मऊ होण्यासाठी, रुक्षपणा घालवण्यासाठी कलिंगडाचा रस चेहऱ्याला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवावा. 


ओठांचे सौंदर्य कसे टिकवायचे? 

चेहऱ्याच्या सौंदर्यात निरोगी त्वचेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ओठांनाही आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ओठांची काळजी घेतली तर संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसेल. * ओठांसाठी नेहमी उत्तम दर्जाची "लिप प्रॉडक्‍ट्‌स' वापरावीत. शक्‍यतो नॅचरल लिपस्टिकचा वापर करावा. 

* लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना "लिप प्रोटेक्‍टर' लावावे. त्यामुळे ओठ काळे पडणार नाहीत. 

* ओठांचा काळेपणा नष्ट करण्यासाठी लिंबाचा रस आणि ग्लिसरिन यांचे मिश्रण लावावे. 

* थंडीच्या दिवसांत ओठ फुटण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ओठांना नियमित साजूक तूप, ताजी साय लावावी. त्यामुळे ओठांचा मऊपणा टिकून राहायला मदत मिळेल. 

डोळ्यांचे सौंदर्य 

खरे तर आपले डोळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवण्याचे कामही हे डोळेच करत असतात. या डोळ्यांचे सौंदर्य जपावे यासाठी डोळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डोळे आरोग्यदायी दिसू शकतील. 
* डोळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत. 

* डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डोळ्यांखाली लावाव्यात. 

* डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. 

* संगणकाच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. तो ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डोळ्यांना हलका मसाज करावा. 

* डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे. 

 * झोपताना डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घातल्याने किंवा आयुर्वेदिक काजळ घातल्यानेही डोळ्यांचे आरोग्य टिकून राहायला मदत मिळते. 


हाता-पायांचीही काळजी 

चेहेऱ्याची जितकी काळजी घेतली जाते तेवढी हाता-पायांची घेतली जातेच असे नाही. त्यामुळे अनेकदा हात-पाय काळवंडलेले दिसतात. चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठीही घरच्या घरी उपाय करता येतात. 


* उन्हाने रापलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात कालवून हातांना मसाज करावा. 

* पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. 

* लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. 

* थंडीच्या दिवसांत हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो. 

* आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात 10 मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. त्यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. 


* पायांना भेगा असल्यास ग्लिसरिन व लिंबूरसाचे मिश्रण भेगांना रोज रात्री लावल्यानेही फायदा होऊ शकतो. 


* नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्‍यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते. 

* नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. 


निरोगी केसांसाठी 


लांबसडक, निरोगी, काळेभोर केस हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 


* केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना 10 मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत. 


* केसांना चमक येण्यासाठी मसूर डाळ पाण्यात वाटून केलेला लेप केसांना लावावा. 


* केसांना मेंदी लावल्याने "नॅचरल कंडिशनिंग' तर होतेच, शिवाय शरीरातील उष्णताही कमी होते आणि डोक्‍याच्या त्वचेचा कोरडेपणा जातो. 

* काकडीचा रस केसांना लावल्याने केसांची चांगली वाढ होते. 


* खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही. 


* वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून, गाळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसांना चांगला रंग येतो व केस मजबूत व्हायला मदत होते. 

* केसांचे आरोग्य टिकावे यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत व धुण्यापूर्वी केसांना तेल लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. 


* केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात. एकूणच सांगितल्याप्रमाणे साध्या-सोप्या उपायांचा अवलंब केला, तर घरच्या घरी नखशिखांत सौंदर्य खुलवणे आपल्याच हातात असेल, नाही का? हे सौंदर्याचे एक परिमाण मानले जाते. मात्र, केसांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी त्यांची जाणीवपूर्वक काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. 

(वरील माहिती शेअर करा आणि जपून ठेवा )