नवजात बालकाची काळजी




बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम काय करतात ?

बाळाचा जन्म झाल्यावर प्रथम त्याची नाळ कापतात. नाळ कापताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. विळा, सुरी, कात्री वगैरे जे सापडेल त्याने  नाळ कधीही कापू नये. नवीन ब्लेड व दोरा १५ मिनिटे पाण्यात उकळत ठेवावा. निर्जंतुक केलेला दोरा घेऊन बेंबीपासून चार बोटं किंवा सुमारे २ इंच अंतरावर दोऱ्याने नाळ बांधून घ्यावी व नवीन ब्लेडने कापावी. नाळेवर हळद-कुंकू, बुक्का, राख पावडर असं काहीही लावू नये.

बाळ जन्माला आल्यावर रडलं म्हणजे काय समजतात?

बाळ जन्मत:च रडले पाहिजे. ते रडले म्हणजे त्याचे नवे जीवन सुरळीत झाले असे समजावे. कारण त्यामुळे त्याची श्वास घेण्याची क्रिया सुरु झाल्याचे लक्षात येते.

बाळ रडलं नाही तर काय करावं ?

प्रथम बाळाचे पाय हातात धरून उलटे करावे. बाळाच्या नाकातोंडात गेलेले पाणी बाहेर काढावे. तोंड आतून स्वच्छ करावे. स्वच्छ करताना करंगळीला निर्जंतुक जाळीदार कापड गुंडाळावे व हळुवारपणे पुसून तोंडातील चिकट पदार्थ बाहेर काढावा. तसेच त्याच्या तळपायावर टिचकी मारून पहावं. एवढया प्रयत्नाने ते रडू लागले नाही तर त्याला हळूहळू तोंडात फुंकर मारून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. तातडीने डॉक्टरांना बोलवावे.

बाळ जन्माला आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी पाहतात ?

  • बाळ जन्मल्या बरोबर बाळाचे लिंग व्यवस्थीत आहे की नाही ते पाहणे गरजेचे आहे.
  • बाळाच्या शरीरात कुठे व्यंग असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
  • अन्न नलिका बंद असल्यास तोंडास फेस येतो.
  • संडासची जागा उघडी आहे की नाही ते पहावे.
  • तसेच बाळाचे नाक, कान, तोंड व पूर्ण शरीर हे निर्जंतूक कापसाच्या बोळ्याने पुसून घ्यावे.
  • जन्मलेल्या बाळाचं वजन किती असावं?

    जन्मत: बाळाचं वजन निदान अडीच किलो (पाच पौंड) असावे. पाचव्या महिन्यात ते दुप्पट होते, आणि १ वर्षाने तिप्पट होते. बाळाचं वजन अडीच किलो पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
    अपूर्ण वाढीचे मूल कसे ओळखावे ?
    बाळंतपण ३७ आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन २ किलो पेक्षाही कमी असते. उंची १८ इंचापेक्षा कमी असते. तसेच त्याची हालचालही कमी असते व डोकं मोठे असते. रंग लालसर पण हातपाय निळसर असतात अशा बाळांना दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रावर नेणे गरजेच असते.

    बाळाचे वजन कमी असल्यास काय काळजी घ्यावी ?

  • त्याला सतत आईच्या जवळ ठेवावे.
  • बाळाला नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्यावर टोपी घालावी.
  • आईने बाळाला स्तनपान नीट काळजीने करावे. स्तनपान दर दोन तासांनी (थोडया-थोडया अंतराने) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. तसेच त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे.
  • बाळाची नाळ किती दिवसांनी पडते ?

    साधारणपणे ६-७ दिवसांनी बाळाची नाळ पडते. पहिले ३-४ दिवस त्यातून थोडा स्त्राव येतो. त्यामुळे तिथे ओलसरपणा राहिला किंवा नाळेतून पू येऊ लागला तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

    प्रत्येक बाळाला जन्मल्यावर कावीळ होते का ?

    सुमारे निम्म्या बाळांना जन्मल्यावर तिसऱ्या दिवशी कावीळ होते व ५-६ दिवसांनी ती कमी होते किंवा आपोआप नाहीशी होते. आईच्या रक्तपेशी बाळाच्या रक्तात असतात. त्यांचा नाश झाल्यामुळे कावीळ होते. त्याबद्दल फारशी काळजी करू नये. ती नैसर्गिक प्रक्रियाच असते. पण जन्मल्यानंतर लगेच कावीळ दिसल्यास  किंवा ७-८ दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकल्यास मात्र डॉक्टरांना दाखवने आवश्यक असते.

    जन्मल्यानंतर बाळ शी-शू कधी करते ?


    पहिल्या १२ तासाच्या आत बाळाला हिरवट काळसर शी होते. अशी शी ३-४ दिवस होते. एक संपूर्ण दिवस बाळाला शी झाली नाही तर काही व्यंग आहे का ते पहावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतेक मुले एक-दोन दिवसात शू करतातच. त्यावर लक्ष ठेवावे. कपडे ओले होतात की नाही ते पहावे. लघवीची धार व्यवस्थित असेल तर मुत्रमार्गाला काही अडचण नाही असे समजावे . शू केला नाही तर डॉक्टरांना दाखवावे