बाळाला रोज तेल लावून आंघोळ घालावी का ?
बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कानात, गुदद्वारात तेल सोडणे चुकीचे आहे. आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. बाळाचे अंग पोट रगडू नये, हात, पाय हलक्या हाताने चोळावेत. दूध, हळद डाळीचे पीठ एकत्र करून अंगास लावावे व नंतर पाण्याने किंवा साबणाने अंग स्वच्छ धुवावे. बाळाच्या त्वचेवर जी लव असते ती चोळून काढण्याचा प्रयत्न करू नये. आंघोळ झाल्यावर मऊ स्वच्छ फडक्याने बाळाचे अंग टिपावे. जोराने पुसू नये.
आंघोळीनंतर बाळाला काजळ घालण्याचे काहीच कारण नाही. काजळाने डोळे मोठे होतात, डोळे स्वच्छ राहतात हे सारे चुकीचे आहे. उलट काजळ घातल्याने काजळाने किंवा अस्वच्छ बोटांमुळे जंतूदोष निर्माण होऊ शकतो. काजळ लावल्यामुळे दृष्ट लागत नाही, अशाही भोळ्या समजुतीने काजळ लावले जाते तेही चुकीचे आहे.
बाळाच्या टाळूची काळजी कशी घ्यावी ?
टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. तसे करण्याचे काहीच कारण नाही. कारण मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात. साधारणपणे एक ते दीड वर्षात ती जुळून येतात. ती जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.
बाळ झोपत नसले, रडत असले तर त्याला काय झाले असावे ?
त्याला किडा मुंगी चावली असेल किंवा डास, ढेकूण चावले असावेत. बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत.
बाळाचे कपडे कसे असावेत ?
बाळाचे कपडे सैल असावेत. सुती असावेत. थंडीच्या दिवसात गरम कपडे असावेत पण ते आतून मऊ असावेत. प्लास्टिक चड्डी, नायलॉनचे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ओले केलेले कपडे त्वरित बदलावेत. कपडे स्वच्छ असावेत.
Post a Comment